या तारखेला धो-धो पाऊस बरसणार; पंजाब डख यांचा नवीन अंदाज आला

पंजाब डख नवीन हवामान अंदाज : राज्यातील वाढत्या उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी आणि पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी राज्याच्या हवामानाचा आणि पावसाचा नवीन अंदाज वर्तवला असून, राज्यात कोणत्या तारखेपासून पाऊस बरसणार, याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

१५ मे नंतर उन्हाचा पारा घसरणार

सध्या राज्याच्या अनेक भागांत तापमानाने उच्चांक गाठला आहे. पिके पाण्यावाचून सुकत आहेत. मात्र, डख यांच्या नवीन अंदाजानुसार १५ मे नंतर राज्यातील उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या खाली येणार आहे. यामुळे उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

१४ ते ३० मे दरम्यान मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

राज्यात १४ मे ते ३० मे या कालावधीत मान्सूनपूर्व (अवकाळी) पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे. हा पाऊस सलग एकाच ठिकाणी न पडता, दररोज आपली जागा बदलून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दोन-दोन दिवस कोसळेल. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात हा पाऊस विखुरलेल्या स्वरूपात पडेल. यामुळे जमिनीला वाफसा येऊन शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग येणार आहे.

मान्सून महाराष्ट्रात कधी धडकणार?

सर्वांचे लक्ष लागून असलेला मुख्य मान्सून १७ मे रोजी अंदमान बेटांवर अधिकृतपणे दाखल होणार आहे. यासाठी १२ मे पासूनच पोषक वातावरण तयार होत आहे. अंदमानातून पुढे वाटचाल करत, साधारण ७ जूनच्या आसपास मान्सून महाराष्ट्रात आपली दमदार एन्ट्री करेल, असा स्पष्ट अंदाज पंजाब डख यांनी वर्तवला आहे.

शेतकरी महत्त्वाचा सल्ला

फायदा कुणाला?: या मान्सूनपूर्व पावसामुळे पाण्याची कमतरता असलेल्या उसाला जीवदान मिळेल. तसेच नवीन हळद लागवड आणि सिल्लोड परिसरातील मिरची पिकासाठी हा पाऊस अतिशय पोषक ठरणार आहे.
नुकसानीची शक्यता: ज्या शेतकऱ्यांनी हळद काढून शेतात ठेवली आहे, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत १४ मे पूर्वी ती सुरक्षित ठिकाणी किंवा घरात आणून ठेवावी. पावसाने हळदीचे मोठे नुकसान होऊ शकते.
वीट उत्पादकांना इशारा: वीटभट्टी व्यावसायिकांनीही आपली कामे १४ तारखेपर्यंतच उरकून घ्यावीत. त्यानंतर सुरू राहणाऱ्या पावसामुळे विटांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

शेतकरी बांधवांनी हवामानाचा हा नवीन अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेतीच्या आणि मशागतीच्या कामांचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment