नमस्कार शेतकरी मित्रांनो! गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी कडकडीत ऊन पडले आहे. पेरण्या खोळंबल्या आहेत आणि आपला बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. पण आता काळजीचे काहीही कारण नाही! कारण प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी एक अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी दिली आहे. १५ जुलैपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाची दमदार एन्ट्री होणार असून, विदर्भासह राज्याच्या अनेक भागांत तो मुसळधार बरसणार आहे. चला तर मग, सविस्तर जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यात कधी पाऊस पडणार?
१५ जुलैपासून पावसाला पुन्हा सुरुवात
सध्या १४ जुलैपर्यंत राज्यात हवामान कोरडे राहील. मात्र, १५ ते १६ जुलैच्या दरम्यान वरुणराजा पुन्हा सक्रिय होईल. याची सुरुवात मुंबई, पुणे, नाशिक आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवरून होईल. या दरम्यान राज्याच्या वेगवेगळ्या भागात, विशेषतः पूर्व-पश्चिम विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि उत्तर-दक्षिण महाराष्ट्रात एकाच वेळी सर्वदूर नाही, पण विखुरलेल्या स्वरूपात पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात होईल.
२० जुलैनंतर पावसाचा जोर वाढणार
१५ तारखेला सुरू झालेला हा विखुरलेला पाऊस हळूहळू आपला जोर वाढवेल. २० ते २३ जुलै दरम्यान मुंबई, पुणे आणि नाशिक परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्याच्या इतर भागातही या काळात पावसाचे प्रमाण पुन्हा वाढलेले दिसेल.
विदर्भासाठी हाय अलर्ट! (२२ ते २५ जुलै)
सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आहे. २२ ते २५ जुलै दरम्यान विदर्भात जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. २१-२२ तारखेपासून एक कमी दाबाचा पट्टा (चक्रीवादळ सदृश्य स्थिती) तयार होत असून, तो विदर्भातून अमरावती, अकोला, बुलढाणा मार्गे हिंगोली व परभणीकडे सरकेल.
मराठवाडा आणि इतर जिल्ह्यांची स्थिती
जेव्हा विदर्भात मुसळधार पाऊस कोसळत असेल, तेव्हा मराठवाड्यात मात्र ढगाळ वातावरण आणि रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर आणि अहिल्यानगर या पट्ट्यात १५-१६ तारखेला आणि त्यानंतर २०-२१ तारखेला पावसाची हजेरी दिसेल.
नंदुरबार जिल्ह्यासाठी खास अपडेट:
नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे, १५ आणि २० तारखेला तिथे काही प्रमाणात पाऊस हजेरी लावेल. मात्र, खऱ्या अर्थाने २२ ते २५ जुलैच्या दरम्यान नंदुरबारमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे.
ज्या भागात पाऊस नाही, त्यांचे काय?
ज्या भागात अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही, त्यांच्यासाठी २७ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान एक नवीन हवामान प्रणाली तयार होणार आहे. त्यामुळे राज्याच्या उरलेल्या कोरड्या भागातही या काळात चांगला पाऊस होईल.
शेतकऱ्यांसाठी मोलाचा सल्ला
सध्या १४ जुलैपर्यंत पावसाची उघडीप असल्याने, ज्यांची काही शेतीची फवारणी किंवा मशागतीची कामे अपूर्ण असतील ती त्वरित उरकून घ्यावीत. कारण १५ जुलैनंतर पावसाला सुरुवात होईल आणि २० तारखेनंतर तो सर्वत्र वाढेल.