e-pik pahani new gr : नमस्कार शेतकरी मित्रांनो! खरीप हंगाम सुरू झाला की आपल्या सर्वांची एकच धांदल उडते, ती म्हणजे ‘ई-पीक पाहणी’ करण्याची. अनेकदा सर्व्हर डाऊन असतो, तर कधी ॲप चालत नाही, आणि त्यातच वेळ निघून जातो. पण यावर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांची ही मोठी डोकेदुखी कायमची दूर केली आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचताय! २०२६ च्या खरीप हंगामापासून ई-पीक पाहणीच्या प्रक्रियेत शासनाने काही क्रांतिकारी बदल केले आहेत. नुकताच १५ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील नवीन शासन निर्णय (GR) धडकला असून, आता शेतकऱ्यांना स्वतः मोबाईलवर पीक पाहणी करावी लागणार नाही. चला तर मग, शासनाच्या या नव्या नियमांबद्दल आणि प्रक्रियेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
नवा बदल नेमका काय आहे?
आतापर्यंत आपण स्वतः मोबाईल ॲपवर पीक पाहणी करत होतो. पण आता शासनाच्या ‘डिजिटल क्रॉप सर्वे महाराष्ट्र’ (DCS MH) या नव्या ॲप्लिकेशनद्वारे हे काम १००% पूर्ण केले जाणार आहे. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, हे काम आता तुम्हाला स्वतः करावे लागणार नसून शासनाने नियुक्त केलेले ‘पीक पाहणी सहाय्यक’ करणार आहेत.
कोण आहेत हे पीक पाहणी सहाय्यक?
तुमच्या गावातील १००० ते १५०० शेतजमिनींच्या गटांमागे एका सहाय्यकाची नियुक्ती खुद्द तहसीलदार साहेब करतील. गाव मोठे असेल, तर दोन किंवा त्यापेक्षा जास्त सहाय्यक असतील. या कामासाठी गावातीलच आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक, कोतवाल, बचत गटांचे सदस्य, सीएससी (CSC) सेंटर चालक किंवा नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक यांची नेमणूक केली जाणार आहे.
प्रत्यक्ष पाहणी कशी होणार?
हा नियुक्त केलेला सहाय्यक तुमच्या शेतात प्रत्यक्ष येईल. शेताच्या बांधापासून २० मीटरच्या आत उभे राहून, पिकांचे आणि बांधावरील झाडांचे अक्षांश-रेखांशासह (जिओ टॅगिंग) दोन फोटो या नव्या ॲपवर अपलोड करेल. सोबतच, ‘मी भरलेली माहिती अचूक आहे’ असे एक स्वयंघोषणापत्रही या सहाय्यकाला ॲपवर द्यावे लागेल, ज्यामुळे माहितीत पारदर्शकता राहील.
तलाठी साहेबांची भूमिका काय?
सहाय्यकाने भरलेली माहिती थेट फायनल होणार नाही. गावाचे तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) या सर्व नोंदींची १००% पडताळणी करतील. जर एखादी नोंद वस्तुस्थितीशी विसंगत किंवा चुकीची वाटली, तर तलाठी ती तत्काळ रद्द करू शकतात आणि ती पुन्हा नोंदवण्यासाठी सहाय्यकाला पाठवू शकतात. सर्व माहिती बरोबर असल्यावरच ती तुमच्या सातबारा (गाव नमुना नंबर १२) उताऱ्यावर झळकेल.
पिकाची नोंद चुकल्यास काय करायचे?
कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जर सहाय्यकाने पिकाची नोंद चुकीची केली आणि ती तलाठ्याकडूनही मंजूर झाली तर काय? घाबरू नका! अशा परिस्थितीत चालू हंगाम संपण्यापूर्वी तुम्हाला थेट ‘मंडळ अधिकारी’ यांच्याकडे अर्ज करता येईल. मंडळ अधिकारी या अर्जाची दखल घेऊन योग्य ती पडताळणी करतील आणि चूक असल्यास ती दुरुस्त केली जाईल.
फळबाग उत्पादकांसाठी मोठी गुड न्यूज!
जर तुमच्या शेतात आंबा, काजू, पेरू किंवा चिकूची बाग असेल, तर तुमच्यासाठी एक खास सोय करण्यात आली आहे. एकदा का फळबागेची पीक पाहणी झाली, की पुढची सलग तीन वर्षे तुम्हाला किंवा सहाय्यकाला पुन्हा नोंद करण्याची गरज नाही. तीच नोंद आपोआप पुढची ३ वर्षे सातबारा उताऱ्यावर दिसत राहील.
फायदे आणि थोडक्यात निष्कर्ष…
या डीसीएस (DCS) ॲपवर भरलेली माहिती पुढील ३ वर्षे ऑनलाइन उपलब्ध राहील आणि ५ वर्षे शासनाकडे डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहील. याच अचूक माहितीच्या आधारे तुम्हाला पीक विमा, पीक कर्ज आणि शासनाच्या इतर कृषी योजनांचा लाभ मिळणे अत्यंत सोपे होणार आहे.