शेतकरी मित्रांनो, शेती म्हटलं की पाण्याची शाश्वत सोय असणे अत्यंत गरजेचे असते. पण नुसते पाणी उपलब्ध असून भागत नाही; तर ते पिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य पाईपलाईन आणि उत्तम प्रतीचा पाण्याचा पंप असणेही तेवढेच महत्त्वाचे असते. बऱ्याचदा आर्थिक चणचणीमुळे ही महागडी साधने खरेदी करणे सामान्य शेतकऱ्यांना शक्य होत नाही. मात्र, आता तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही!
शासनाच्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना पाईप खरेदीसाठी चक्क १००% आणि पाण्याचा पंप (पंपसेट) खरेदी करण्यासाठी ९०% अनुदान दिले जात आहे. सोशल मीडियावर या योजनेबद्दल बरीच चर्चा सुरू आहे, पण नक्की ही योजना कोणती? याचे नियम काय आहेत? आणि अर्ज कुठे करायचा? याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम आहे. चला तर मग, आजच्या या ब्लॉग पोस्टमध्ये आपण याविषयी सविस्तर आणि अचूक माहिती जाणून घेऊया.
नेमकी कोणती आहे ही योजना?
ही योजना ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा २)’ म्हणजेच ‘पोकरा २.०’ (PoCRA 2.0) अंतर्गत राबवली जात आहे. राज्यातील जवळपास २१ जिल्ह्यांमधील निवडक ७,२०१ गावांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ कोणाला मिळेल?
सदर योजना ही विशेषतः अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकरी बांधवांसाठी राबवली जात आहे. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या व्यतिरिक्त ही एक मोठी संधी आहे.)
लाभासाठी आवश्यक अटी
१. शेतकऱ्याकडे एकूण शेतजमीन ५ हेक्टरच्या आत असली पाहिजे.
२. शेतात सिंचनासाठी पाण्याची सोय असल्याचा पक्का पुरावा (उदा. ७/१२ उताऱ्यावर विहीर/पाण्याची नोंद) असणे अनिवार्य आहे.
३. एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा फायदा घेता येईल.
अनुदानाचे स्वरूप नक्की कसे आहे?
१. पाईप संचासाठी (१००% अनुदान):
तुम्ही शेतीसाठी एचडीपीई (HDPE), पीव्हीसी (PVC) किंवा लॅमिनेटेड पाईप खरेदी केल्यास तुम्हाला पूर्ण म्हणजेच १००% किंवा जास्तीत जास्त ३०,००० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.
(टीप: शासनाने पाईपच्या प्रकारानुसार प्रति मीटर दर निश्चित केले आहेत. जसे की, एचडीपीई पाईपसाठी जास्तीत जास्त १०० रु., पीव्हीसीसाठी ७० रु. आणि लॅमिनेटेड पाईपसाठी ४० रु. प्रति मीटर.)
२. पंपसेटसाठी (९०% अनुदान):
तुम्ही ओपनवेल सबमर्सिबल पंप, मोनोब्लॉक इलेक्ट्रिक पंप (ISI मानांकित) किंवा डिझेल इंजिन खरेदी करू शकता. ५ एचपी ते जास्तीत जास्त १० एचपी क्षमतेपर्यंतच्या मोटारसाठी तुम्हाला एकूण किमतीच्या ९०% किंवा कमाल ४०,००० रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते.
अर्ज कुठे आणि कसा करायचा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन खेटे मारण्याची गरज नाही; तुम्ही घरबसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता.
यासाठी तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या NDKSP या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल.
तिथे तुमचा ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) आणि ओटीपी (OTP) टाकून लॉगिन करा.
‘वैयक्तिक बाबी’ या पर्यायाखाली जाऊन तुम्ही या अनुदानासाठी तुमचा अर्ज सबमिट करू शकता.
महत्त्वाची सूचना: या योजनेत ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ दिले जाते. मात्र, जर शासनाच्या लक्षांकापेक्षा (टार्गेट) जास्त अर्ज आले, तर लाभार्थ्यांची निवड लॉटरी (सोडत) पद्धतीने केली जाईल. निवड झाल्यानंतर तुम्हाला हमीपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील..