महाराष्ट्र: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने कापूस, तूर, सोयाबीन, मूग आणि उडीद यांसारख्या खरिपातील मुख्य पिकांच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे. यापैकी सोयाबीन पिकात सुरुवातीच्या काळात येणारे तण ही शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी असते. मात्र, पेरणी केल्यानंतर लगेचच ‘उगवणपूर्व तणनाशकाचा’ (Pre-emergence Herbicide) अचूक वापर केल्यास सुरुवातीचे तब्बल दोन महिने शेतात तण उगवत नाही आणि पिकाची वाढ जोमदार होते.
उगवणपूर्व तणनाशकच का वापरावे?
अनेक शेतकरी पीक आणि तण उगवल्यानंतर तणनाशकाची फवारणी करतात. परंतु, अशा फवारणीमुळे मुख्य पिकाला मोठा धक्का (शॉक) बसतो. सोयाबीन पिवळी पडते, तिची वाढ काही काळासाठी खुंटते आणि पर्यायाने उत्पादनात मोठी घट येते. याउलट, पेरणी केल्या-केल्या उगवणपूर्व तणनाशक फवारल्यास पिकाला कोणताही शॉक न बसता सुरुवातीच्या काळातच तणाचा १०० टक्के बंदोबस्त करता येतो.
तणनाशकांची निवड आणि प्रमाण:
पेरणी झाल्यानंतर ४८ तासांच्या आत या तणनाशकांची फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या पिकानुसार खालील पर्याय निवडता येतील:
सोयाबीन आणि तूर आंतरपीक: जर सोयाबीनमध्ये तूर हे आंतरपीक असेल, तर ‘टाटा’ कंपनीचे ‘पॅनिडा ग्रांडे’ (ज्यात पेंडीमेथिलीन ३८.७% CS हा घटक असतो) हे तणनाशक अत्यंत प्रभावी ठरते. एका एकरासाठी २०० लिटर स्वच्छ पाण्यात ७०० मिली तणनाशक मिसळून दाट फवारणी करावी.
इतर प्रभावी पर्याय: याशिवाय सुमिटोमो कंपनीचे ‘सुमी मॅक्स’, टाटा कंपनीचे ‘मार्क’ किंवा कॉर्टेव्हाचे ‘स्ट्रॉंग आर्म’ या तणनाशकांचाही वापर करता येतो. तूर आणि सोयाबीन आंतरपीक असल्यास ‘सुमी मॅक्स’चे प्रमाण एका एकरासाठी १५० ते २०० लिटर पाण्यात केवळ १०० मिली इतके ठेवावे.
तणनाशक नेमके काम कसे करते?
फवारणीनंतर हे तणनाशक जमिनीतील तणाच्या मुळांद्वारे आणि कोंबाद्वारे शोषले जाते. यामुळे तणातील एन्झाइम्सचे कार्य पूर्णपणे थांबते. पर्यायाने पेशी विभाजन आणि अमिनो आम्ल तयार होण्याची प्रक्रिया मंदावते आणि तण जमिनीबाहेर येण्याआधीच, म्हणजेच उगवण अवस्थेतच नष्ट होते.
फवारणी करताना घ्यावयाची विशेष काळजी:
शेतकऱ्यांनी फवारणीचा १०० टक्के रिझल्ट मिळवण्यासाठी खालील बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे:
१. वेळेचे बंधन: फवारणीचे काम पेरणीनंतर अवघ्या ४८ तासांच्या आतच पूर्ण व्हावे.
२. जमिनीवरील थर जपा: फवारणीनंतर जमिनीवर औषधाचा एक पातळ थर (Layer) तयार होतो. त्यामुळे फवारणीनंतर पुढील ७ ते ८ दिवस शेतात जाणे किंवा कोणतीही आंतरमशागत करणे टाळावे. शेतात चालल्यास थर तुटतो आणि नेमक्या त्याच जागेवर तण उगवू शकते.
३. पाण्याची शुद्धता: फवारणीसाठी केवळ स्वच्छ पाणीच वापरावे. गढूळ किंवा जास्त क्षारयुक्त (खारट) पाण्याचा वापर केल्यास औषधाचा प्रभाव कमी होतो.
सुरुवातीच्या काळातच तणाचे असे अचूक व्यवस्थापन केल्यास पिकाची वाढ निरोगी होते आणि खुरपणीचा मोठा खर्च वाचून उत्पादनात निश्चितच वाढ होते.