शेतकरी मित्रांनो, नमस्कार! खरीप हंगाम जवळ आला की आपल्या सर्वांना एकाच गोष्टीची मोठी प्रतीक्षा असते, ती म्हणजे ‘पीक विमा’. यावर्षी पीक विमा योजनेत काही मोठे आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचे बदल होतील, अशा बऱ्याच अपेक्षा आपण ठेवून होतो. पण अखेर ३ जुलै २०२६ रोजी राज्य शासनाने खरीप पीक विमा २०२६ आणि रब्बी हंगाम २०२६-२७ साठी नवीन शासन निर्णय (GR) काढला आहे. या नव्या निर्णयात तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत की पुन्हा एकदा जुन्याच अटी आपल्यावर लादल्या गेल्या आहेत? पीक विमा काढण्यासाठी आता कोणते नवीन नियम आले आहेत? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यंदा पीक विमा भरावा की नाही? चला, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या ब्लॉग पोस्टमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया.
जुन्याच अटी आणि जुनेच नियम!
गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांची जोरदार मागणी होती की पीक विम्यात ‘ट्रिगर’ लागू करावेत आणि जोखीम स्तर ७०% पर्यंत वाढवावा, जेणेकरून नुकसान भरपाई मिळणे सोपे होईल. पण, शासनाने या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. नवीन शासन निर्णयानुसार, २०२३ च्याच अटी आणि शर्तींवर ही योजना राबवली जाणार आहे. ज्या ‘कप अँड कॅप’ (Cup and Cap) मॉडेलमुळे मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित राहावे लागले होते, त्याच मॉडेलनुसार यंदाही विमा दिला जाणार आहे. थोडक्यात सांगायचे तर, उत्पादनावर आणि तंत्रज्ञानावर आधारित ५०% भारांकनानुसारच तुमची नुकसान भरपाई ठरणार आहे.
पीक विमा काढण्यासाठी हे नवीन नियम नक्की लक्षात ठेवा!
यंदा पीक विमा योजनेत सहभागी व्हायचं असेल, तर काही गोष्टी नव्याने बंधनकारक करण्यात आल्या आहेत:
एग्रीस्टॅक फार्मर आयडी (Agristack Farmer ID): आता विमा काढताना शेतकऱ्यांकडे हा डिजिटल आयडी असणे अत्यंत अनिवार्य आहे.
ई-पीक पाहणी (डिजिटल क्रॉप सर्वे): विमा अर्ज भरताना कदाचित ई-पीक पाहणीची अट नसेल, पण जेव्हा नुकसानीनंतर भरपाई देण्याची वेळ येईल, तेव्हा तुमच्या पिकाची ई-पीक पाहणी झालेली असणे सक्तीचे आहे. त्यामुळे पेरणीनंतर ही नोंद वेळेत करून घ्या.
किमान क्षेत्र मर्यादा: आता तुम्हाला किमान १० गुंठे (०.२५ एकर) क्षेत्रासाठी विमा अर्ज करता येईल. १० गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्रासाठी विमा काढता येणार नाही.
भाडेपट्ट्यावरील जमीन: जर तुम्ही दुसऱ्याची जमीन कुळाने किंवा भाडेपट्ट्याने (ठोकळ्याने) करत असाल, तरीही तुम्हाला विमा भरता येईल. पण त्यासाठी तुमच्याकडे रीतसर भाडे करार (Rent Agreement) असणे आवश्यक आहे.
बोगस विमा भरल्यास थेट ५ वर्षांची बंदी! (कठोर कारवाई)
यंदा शासनाने फसवणूक रोखण्यासाठी एक अतिशय कडक पाऊल उचलले आहे. जर कोणी चुकीची माहिती देऊन किंवा बोगस पद्धतीने पीक विमा भरल्याचे उघडकीस आले, तर त्या व्यक्तीला केवळ पीक विमा योजनेतूनच नाही, तर ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’सारख्या सर्व डीबीटी (DBT) योजनांमधून तब्बल ५ वर्षांसाठी बाद केले जाईल. त्यामुळे अर्ज भरताना योग्य आणि खरीच माहिती द्या.
विमा हप्ता किती असणार?
विमा हप्त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पूर्वीप्रमाणेच तुम्हाला खरीप हंगामासाठी २%, रब्बी हंगामासाठी १.५% आणि नगदी पिकांसाठी ५% इतकाच विमा हप्ता भरायचा आहे.
यंदा पीक विमा भरावा की नाही?
मित्रांनो, पीक विमा भरायचा की नाही, हा निर्णय पूर्णपणे तुमचा वैयक्तिक (ऐच्छिक) आहे. योजनेतील अटी पाहता गेल्या वर्षीसारखाच थोडा त्रास सहन करावा लागू शकतो, हे नाकारता येत नाही. पण, दुसरी बाजू अशीही आहे की, यावर्षी ‘अल निनो’ (El Nino) चा प्रभाव दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बऱ्याच भागात अजून पेरण्या झालेल्या नाहीत आणि जिथे झाल्या आहेत तिथे पीक हाती येईल की नाही याची कोणतीही शाश्वती नाही.
अशा अनिश्चिततेच्या काळात पिकाला काहीतरी संरक्षण असणे गरजेचे आहे. त्यामुळे, निसर्गाचा लहरीपणा पाहता स्वतःच्या पिकाच्या सुरक्षेचा विचार करून विमा भरणे नक्कीच शहाणपणाचे ठरू शकते.