loan waiver kyc : शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या यादीत आपलं नाव आलंय का? नाव पाहून आनंदात लगेच सीएससी (CSC) सेंटरवर जाऊन केवायसी (KYC) करण्याची घाई करत असाल, तर एक मिनिट थांबा! तुमची ही एक छोटीशी चूक तुम्हाला ३० हजार ते अगदी लाखभराचा फटका देऊ शकते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेताना केवळ घाई केल्यामुळे मोठा तोटा होण्याची शक्यता आहे. ही संभाव्य फसवणूक कशी टाळायची आणि आपले कष्टाचे पैसे कसे वाचवायचे, याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत.
अती घाई संकटात नेई!
सध्या राज्यभरात कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध होत आहेत. यादीत नाव पाहिल्यावर साहजिकच आपला आधार क्रमांक किंवा विशिष्ट क्रमांक घेऊन शेतकरी थेट ‘महा ई-सेवा केंद्र’ किंवा ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर धाव घेत आहेत. तिथे पोर्टलवर लॉग-इन केल्यानंतर शेतकऱ्यांचे बँकेचे नाव, शाखा, कर्ज खाते क्रमांक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘एकूण थकबाकी’ स्क्रीनवर दिसते. पण खरी अडचण नेमकी याच रक्कमेत दडलेली आहे.
कर्जाच्या रकमेत मोठा घोळ!
अनेक शेतकऱ्यांनी २०१९ च्या आसपास किंवा त्यानंतर कर्ज काढले आहे. बऱ्याच जणांना मुद्दल आणि गेल्या काही वर्षांचे व्याज मिळून नक्की किती कर्ज झाले आहे, याचा अचूक आकडा माहीत नसतो. समजा, एखाद्या शेतकऱ्याने १ लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल आणि पोर्टलवर जर ७५ हजार किंवा १ लाख २ हजार रुपये दिसत असतील, तर समजून जा की या माहितीत मोठी तफावत आहे. इथे प्रशासनाच्या किंवा बँकेच्या नोंदीत चूक झालेली असू शकते.
कर्जमाफी KYC करावी का? पहा NPA शेतकरी कर्जमाफीचा नियम
चुकूनही KYC केली तर काय होईल?
जर कर्जाच्या रकमेत अशी तफावत असेल आणि तरीही तुम्ही घाईघाईत KYC पूर्ण केली, तर तुमचं नुकसान निश्चित आहे! कारण, KYC पूर्ण करणे याचाच अर्थ पोर्टलवर दिसणारी चुकीची रक्कम तुम्हाला मान्य आहे, असा होतो. एकदा का तुम्ही ती मान्य केली, की केवळ तिथे नमूद असलेलीच रक्कम तुम्हाला कर्जमाफी म्हणून मिळेल. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जर शेतकऱ्याचे नुकसान झाले, तर नियमानुसार त्याला सर्वस्वी शेतकरीच जबाबदार राहील.
मग आता योग्य मार्ग कोणता?
अजिबात घाबरून जाण्याचे किंवा घाई करण्याचे कारण नाही. या योजनेसाठी आपल्याकडे ३१ मार्च २०२६ पर्यंतची मुदत आहे. याचा अर्थ अद्याप तब्बल आठ महिने आपल्या हातात आहेत. त्यामुळे शांततेने निर्णय घ्या. जर तुमच्या कर्जाच्या रकमेत तफावत किंवा चूक आढळली, तर तिथेच पोर्टलवर ‘तक्रार (Complaint)’ करण्याचे बटन उपलब्ध करून दिलेले आहे.
तुम्ही सेवा केंद्र चालकाला सांगून तुमची रीतसर तक्रार नोंदवू शकता. ही तक्रार थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील ‘कर्जमाफी निवारण समिती’कडे जाते आणि अधिकारी या समस्येवर योग्य तोडगा काढतात.
शेतकरी नेत्यांचा पाठपुरावा
सध्या पोर्टलवर आधीच्याच रकमांमध्ये मोठा घोळ घालून ठेवला असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. या चुकीच्या प्रक्रियेविरोधात आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी आवाज उठवला आहे. त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. कर्जाच्या रकमेतील ही तफावत लवकरात लवकर दूर करून शेतकऱ्यांना व्याजासह २ लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी मिळावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
कर्जमाफी यादीत नाव आले म्हणून हुरळून जाऊन किंवा उत्साहाच्या भरात चुकीच्या रकमेवर KYC अजिबात करू नका. आपले मूळ कर्ज आणि त्यावरील व्याज शांततेने तपासून पाहा. ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे, जी प्रत्येक गावातील बांधवांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळे हा लेख तुमच्या परिचयाच्या प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचेही नुकसान होणार नाही!