ST Smart Card Maharashtra : तुम्ही किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठ मंडळी आणि महिला एसटी बसने नेहमी प्रवास करतात का? जर हो, तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे! ‘आधीच आधार कार्ड आहे, मग हे नवीन NCMC कार्ड कशाला काढायचे?’ असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पण एसटी महामंडळाने आणलेले हे नवीन कार्ड केवळ एक ओळखपत्र नसून तुमच्या प्रवासाची पद्धत अत्यंत सोपी करणारा एक ‘स्मार्ट’ मार्ग आहे. तिकीट काढताना सुट्ट्या पैशांवरून होणारी रोजची कटकट आता या कार्डमुळे कायमची मिटणार आहे. त्यातच एक मोठी आनंदाची बातमी म्हणजे, हे कार्ड काढण्यासाठी शासनाने आता प्रवाशांना मुदतवाढ दिली आहे! चला तर मग सविस्तर जाणून घेऊया हे स्मार्ट कार्ड नक्की काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत.
सुट्ट्या पैशांची कटकट आता कायमची संपणार
अनेकांच्या मनात ही शंका आहे की, एसटीमध्ये सवलत मिळवण्यासाठी फक्त आधार कार्ड पुरेसे का नाही? विनाकारण नवीन कार्डाचा खर्च आणि धावपळ का करायची? पण NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे एक ‘डिजिटल वॉलेट’ आहे. तुम्ही जसा मोबाईल रिचार्ज करता, तसे हे कार्ड रिचार्ज करू शकता.
एसटीत प्रवास करताना बऱ्याचदा ५३ रुपये, ५७ रुपये असे वरचे तिकीट असते आणि अशा वेळी कंडक्टर व प्रवाशांमध्ये दोन-पाच रुपयांच्या सुट्ट्या पैशांवरून (चिल्लर) वाद होतात. अनेकदा वयोवृद्ध प्रवाशांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. पण जर तुमच्या या स्मार्ट कार्डमध्ये बॅलन्स असेल, तर फक्त कंडक्टरला कार्ड द्यायचे, तिकिटाचे नेमके पैसे आपोआप कट होतील. पैसे संपले की पुन्हा रिचार्ज करता येईल. म्हणजेच, सुट्ट्या पैशांची अडचण आता पूर्णपणे दूर होणार आहे!
सावधान! कर्जमाफीची KYC करत असाल तर थांबा.. ही चूक महागात पडू शकते
कार्ड कुठे आणि कसे काढायचे?
सध्या एसटी महामंडळाच्या सर्व बस स्थानकांवर, आगारामध्ये (डेपो) आणि त्यांच्या अधिकृत एजंट्सकडे या कार्डसाठी नोंदणीची प्रक्रिया वेगात सुरू आहे. सवलतीचा लाभ घेणाऱ्या सर्व महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांनी तिथे जाऊन याची नोंदणी करणे आवश्यक आहे.
प्रवाशांसाठी सर्वात मोठा दिलासा! (मुदतवाढ)
सुरुवातीला एसटी महामंडळाने १ ऑगस्टपासून हे कार्ड सवलतीच्या प्रवासासाठी सक्तीचे (बंधनकारक) केले होते. मात्र, अनेक प्रवाशांनी नोंदणी करूनही त्यांना अद्याप कार्ड हातात मिळालेले नाही, तर बऱ्याच जणांना अजून नोंदणी करायला वेळच मिळालेला नाही. प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेऊन आणि कोणालाही विनाकारण पूर्ण तिकीट काढावे लागू नये, यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या कार्डच्या नोंदणीसाठी आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे!
१ सप्टेंबरनंतर काय होईल?
शासनाने मुदतवाढ देऊन दिलासा दिला असला, तरी गाफील राहून चालणार नाही. जर तुम्ही १ सप्टेंबरपर्यंत हे कार्ड प्राप्त केले नाही, तर त्यानंतर एसटी बसमधून प्रवास करताना तुम्हाला कोणत्याही सवलतीचा लाभ घेता येणार नाही. म्हणजेच महिलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण पैसे देऊन तिकीट काढावे लागेल. त्यामुळे लवकरात लवकर जवळच्या बस स्थानकावर जाऊन आपली नोंदणी पूर्ण करा, जेणेकरून वेळेत तुमच्या हातात कार्ड येईल.