खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बळीराजाला मोठा दिलासा दिला आहे. ‘कडधान्य आत्मनिर्भरता अभियान’ आणि ‘राष्ट्रीय खाद्य तेल अभियानां’तर्गत विविध पिकांच्या बियाण्यांवर घसघशीत अनुदान देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. नुकतेच याचे शासन निर्णय (GR) आणि जिल्हानिहाय अनुदानाचे सविस्तर दर जाहीर करण्यात आले आहेत. या महत्त्वपूर्ण योजनेसाठी शासनाने २०० कोटी ७३ लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे.
कोणत्या जिल्ह्यात कोणते बियाणे?
शासनाने भौगोलिक परिस्थितीनुसार जिल्ह्यांची निवड करून बियाणे वाटपाचे नियोजन केले आहे. याची जिल्हानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
सोयाबीन: राज्यातील सर्वाधिक म्हणजेच २६ जिल्ह्यांमध्ये सोयाबीन बियाण्यांवर अनुदान दिले जाणार आहे.
भुईमूग: १३ जिल्ह्यांमध्ये.
करडई: ९ जिल्ह्यांमध्ये.
तीळ: ५ जिल्ह्यांमध्ये.
कारळे (खरीप): केवळ अहिल्यानगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांसाठी.
याशिवाय तूर, मूग, उडीद, हरभरा आणि मसूर यांसारख्या कडधान्यांच्या बियाण्यांसाठीही अनुदान जाहीर करण्यात आले आहे.
सोयाबीनला मिळणार १०० टक्के अनुदान
राज्यात सोयाबीनसाठी ८९,००० हेक्टरचे मोठे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी ६६,७५० क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, केंद्र शासनाच्या दरानुसार सोयाबीन बियाण्यावर ११,००० रुपये प्रति क्विंटल म्हणजेच जवळपास १०० टक्के अनुदान शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. यासाठी तब्बल ७३ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे.
कडधान्यांसाठी अनुदानाचे दर
तूर, उडीद आणि मूग यांसारख्या कडधान्यांसाठी शासनाने खालीलप्रमाणे दर निश्चित केले आहेत:
नवीन वाण (१० वर्षांच्या आतील): ६,००० रुपये प्रति क्विंटल किंवा ५०% (जे कमी असेल ते) अनुदान.
जुने वाण (५ ते १० वर्षे): ३,००० रुपये प्रति क्विंटल किंवा ५०% अनुदान.
पीक प्रात्यक्षिके आणि बियाणे किट्स
केवळ बियाणेच नाही, तर शेतात पीक प्रात्यक्षिके घेण्यासाठी शासनाकडून प्रति हेक्टरी १०,००० रुपयांच्या मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे. याचा अर्थ एका शेतकऱ्याला साधारण ४,००० रुपयांपर्यंतचा फायदा होऊ शकतो. तसेच तूर, उडीद आणि मुगाच्या हजारो ‘बियाणे किट्स’ शेतकऱ्यांना वाटल्या जाणार आहेत.
येथे वाचा – खुशखबर! भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्यांना आता पीककर्ज, विमा मिळणार
अर्ज कसा करावा?
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर जाऊन ‘बियाणे घटकाअंतर्गत’ ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. हा अर्ज शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून किंवा जवळच्या सीएससी (CSC) केंद्रावर जाऊन फक्त ₹२३.६० रुपये शुल्क भरून करू शकतात. खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज दाखल करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
Mala soybean dhone