मृग नक्षत्र निघून गेले तरी अद्याप अनेक भागात पावसाने दमदार हजेरी न लावल्यामुळे बळीराजा चिंतेत होता. मात्र, आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान अभ्यासक तोडकर साहेबांनी वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार, राज्यात लवकरच मेघगर्जनेसह पावसाची दमदार एन्ट्री होणार आहे. येत्या २२ जूनच्या संध्याकाळपासून राज्याच्या हवामानात मोठा बदल होणार असून, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा महत्त्वाचा सल्लाही देण्यात आला आहे.
२२ आणि २३ जूनला पावसाचा जोर वाढणार
हवामान अंदाजानुसार, आज २० जून आणि उद्या २१ जून रोजी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भातील काही मोजक्या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल. मात्र, खऱ्या अर्थाने पावसाची दमदार सुरुवात २२ जूनच्या संध्याकाळपासून होणार आहे. २२ तारखेला मेघगर्जनेसह पाऊस राज्यात प्रवेश करेल आणि २३ तारखेला या पावसाची व्याप्ती दुप्पट होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये बरसणार पाऊस?
या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फायदा मराठवाड्याला होणार आहे. बीड, जालना, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण उत्कृष्ट राहील. याशिवाय अहिल्यानगर, जळगाव, नांदेड आणि हिंगोलीपर्यंत पावसाचा जोर पाहायला मिळेल. २२ तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत हा पाऊस विदर्भातील वाशिम, अकोला आणि यवतमाळपर्यंत आपली मजल मारेल.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला: पेरणीची घाई नको!
सध्या अनेक शेतकरी पेरणीसाठी आणि विशेषतः ‘धूळपेरणी’ करण्यासाठी उतावीळ झाले आहेत. मात्र, तोडकर साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, शेतकऱ्यांनी आत्ताच पेरणी करू नये. २२ आणि २३ तारखेला जमिनीत चांगला ओलावा निर्माण होईल इतका पाऊस पडू द्यावा. त्यानंतरच २४ तारखेला किंवा जमिनीत पुरेशी ओल असल्याची खात्री झाल्यानंतरच पेरणीचा अंतिम निर्णय घ्यावा. तसेच, शासनाच्या कृषी विभागाचा अधिकृत सल्ला आल्याशिवाय पेरणी करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
येथे वाचा – कर्जमाफीसाठी ही 3 कागदपत्रे बँकेत द्यावी लागणार, कर्जमाफीसाठी आवश्यक कागदपत्रे
जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाची हजेरी
ही केवळ एक-दोन दिवसांची पावसाची हजेरी नसून, हा पावसाळी माहोल साधारणपणे ४ ते ६ जुलैपर्यंत राज्यात कायम राहणार आहे. एखादा दिवस पावसाची उघडीप मिळाली तरी, येणारे आगामी दिवस शेतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत अनुकूल असणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्यातरी धूळपेरणी टाळावी आणि पावसाने जमिनीची तहान भागवल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी, जेणेकरून दुबार पेरणीचे संकट ओढावणार नाही.

Santosh Kale Patil is the Founder and Chief Editor of Sheti 24 Taas. As a dedicated digital content creator and agricultural journalist from Maharashtra, he specializes in providing authentic daily market rates (Bajar Bhav), crop insurance updates, and vital farming news. His primary mission is to empower the ‘Biliraja’ (farmers) by delivering timely, accurate, and fact-checked information.