शेतकरी मित्रांनो, २०२६ चा खरीप हंगाम आता अगदी एका महिन्यावर येऊन ठेपला आहे. मे महिना सुरू झालाय आणि लवकरच जूनच्या पहिल्या पावसातच आपला मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ कापूस लागवडीसाठी सज्ज होईल. कापूस हे आपल्याकडचं प्रमुख नगदी पीक आहे. पण दरवर्षी एकच प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो – ‘यंदा नेमकं कोणतं बियाणं पेरायचं?’ बाजारात एवढे नवनवीन पर्याय असतात की आपला गोंधळ उडणं साहजिक आहे. म्हणूनच, आजच्या या ब्लॉगमध्ये आपण २०२६ साठी कापसाचे योग्य बियाणे कसे निवडायचे आणि भरघोस उत्पादन कसे घ्यायचे, यावर सविस्तर चर्चा करणार आहोत.
जमिनीनुसार करा बियाण्यांची योग्य निवड
बऱ्याचदा आपण काय करतो की, जे बियाणं टॉपचं आहे किंवा ज्याची सगळीकडे चर्चा आहे, तेच आपणही डोळे झाकून आणतो. पण केवळ बियाणं चांगलं असून चालत नाही, तर ते तुमच्या जमिनीत कसं तग धरतं हे जास्त महत्त्वाचं आहे. तुमची जमीन काळ्या कसदार पोताची (भारी जमीन) आहे, पाण्याखालची आहे की एकदम हलकी आणि भुरकट आहे? यावर तुमची निवड पूर्णपणे अवलंबून असली पाहिजे. भारी जमिनीत बक्कळ उत्पादन देणारं वाण हलक्या जमिनीत चालेलच असं नाही. त्यामुळे आधी आपल्या जमिनीचा प्रकार ओळखा आणि त्यानुसारच योग्य वाणाची निवड करा.
बियाणे निवडताना ‘या’ दोन गोष्टी कायम लक्षात ठेवा:
कोणतही वाण निवडताना दोन निकष अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे तुम्ही पक्के लक्षात ठेवले पाहिजेत:
१. मोठ्या आकाराची (टपूरी) बोंडे: बोंड जेवढं मोठं आणि वजनदार, तेवढा कापसाचा उतारा साहजिकच जास्त मिळतो. बारीक बोंडांचे पाच वेचे करण्यापेक्षा, मोठ्या बोंडाच्या एका वेच्यात जास्त कापूस हाती लागतो. त्यामुळे लागवडीसाठी शक्यतो टपूरी बोंडे असलेल्या जातीलाच पसंती द्या.
२. पिकाचा कालावधी (१५० ते १६० दिवस): आजकाल हवामानाचा काही भरवसा राहिलेला नाही. पावसाचा लपंडाव सतत सुरू असतो. त्यामुळे असं बियाणं निवडा जे जास्तीत जास्त १५० ते १६० दिवसांत पूर्णपणे तयार होऊन शेतातून बाहेर पडेल. जर तुम्ही जूनमध्ये लागवड केली, तर नोव्हेंबर-डिसेंबरच्या अखेरीपर्यंत तुमचा कापूस घरात आला पाहिजे. लवकरात लवकर येणारे वाण निवडणे आजच्या काळात खूप गरजेचे आहे.
एक खास शिफारस: ‘मायको बाऊन्सर’ (Mahyco Bouncer)
यावर्षी बाजारात अनेक व्हरायटीज आहेत, पण एका उत्तम वाणाचा इथे मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो, ते म्हणजे मायको सीड्स कंपनीची ‘बाऊन्सर’ (Bouncer). ही व्हरायटी गेल्या दोन-तीन वर्षांपासून चांगलीच गाजतेय. जर तुमची जमीन काळीभोर असेल आणि तुमच्याकडे ठिबक सिंचनाची (Drip Irrigation) उत्तम सोय असेल, तर हे बियाणं तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतं. अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात एका प्रगतशील शेतकऱ्याने ४ बाय २ किंवा ४ बाय २.५ च्या अंतरावर बाऊन्सरची लागवड करून चक्क एका एकरातून २२ क्विंटलचे विक्रमी उत्पादन घेतले आहे! त्यामुळे बागायती आणि भारी जमिनीसाठी या वाणाचा नक्कीच विचार करू शकता.
येथे वाचा – मल्चिंग पेपरवर मिळवा ५०% अनुदान! पहा अर्ज करण्याची सोपी पद्धत
शेतकरी मित्रांनो, बियाणे निवडणे हा शेतीतला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. इथं चुकलात तर संपूर्ण हंगाम वाया जाऊ शकतो, त्यामुळे विचारपूर्वक आणि आपल्या मातीचा अंदाज घेऊनच निर्णय घ्या.
तुमचा अनुभव नक्की सांगा: कंपन्यांच्या जाहिराती थोडावेळ बाजूला ठेवूया, मला तुम्हाला थेट विचारायचं आहे—तुमच्या मते आतापर्यंतचं सर्वात बेस्ट कापूस बियाणं कोणतं? तुम्ही एका एकरातून जास्तीत जास्त किती क्विंटल उत्पादन काढलंय? आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून किंवा तालुक्यातून हा लेख वाचत आहात? हे खाली कमेंट करून नक्की सांगा.

Santosh Kale Patil is the Founder and Chief Editor of Sheti 24 Taas. As a dedicated digital content creator and agricultural journalist from Maharashtra, he specializes in providing authentic daily market rates (Bajar Bhav), crop insurance updates, and vital farming news. His primary mission is to empower the ‘Biliraja’ (farmers) by delivering timely, accurate, and fact-checked information.