पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी पावसाचा नवीन अंदाज वर्तवला असून, आजपासून म्हणजेच २१ जूनपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. येत्या काही दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असून, रखडलेल्या पेरण्यांना आता वेग येणार आहे.
२३ ते २४ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून
पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जूनपासून राज्यात पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर २२ जून रोजी पावसाचा जोर आणखी वाढेल आणि तो राज्याच्या बहुतांश भागाला कव्हर करेल. २३, २४ आणि २५ जून या काळात मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होईल. सोमवारपासून (२२ जून) पावसाचे प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढत जाईल आणि २ ते ५ जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र चांगल्या पावसाची नोंद होईल. पाऊस एकाच वेळी सर्वत्र न येता तो हळूहळू पुढे सरकत असतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडा धीर धरावा, असेही ते म्हणाले.
घाबरू नका, ८० टक्के पेरण्या जूनअखेर होणार
हवामानातील बदलांमुळे पावसाचे चक्र यंदा साधारण २२ दिवस पुढे सरकले आहे. त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या होणे हे आता एक नवीन गणित बनत चालले आहे. शेतकऱ्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये, यंदा पावसाळा चांगला राहणार असून सर्वांच्या पेरण्या होणार आहेत, असा विश्वास डख यांनी व्यक्त केला.
राज्यातील पेरण्या तीन टप्प्यांत होणार असल्याचे त्यांनी सांगितले:
पहिला टप्पा: दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांत सुरुवातीलाच पेरण्या झाल्या आहेत.
दुसरा टप्पा (२१ ते ३० जून): हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असून, या काळात चांगला पाऊस झाल्यामुळे राज्यातील जवळपास ८० टक्के पेरण्या पूर्ण होतील.
तिसरा टप्पा (१० ते १५ जुलै): ज्या भागात पाऊस कमी असेल किंवा जमिनीला वापसा नसेल, अशा उर्वरित भागांतील शेतकऱ्यांच्या पेरण्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होतील.
येथे वाचा – कर्जमाफीसाठी ही 3 कागदपत्रे बँकेत द्यावी लागणार, कर्जमाफीसाठी आवश्यक कागदपत्रे
७२ तासांत पावसाचा निसर्ग संकेत
पावसाचा अंदाज ओळखण्यासाठी पंजाब डख यांनी एक सोपी निसर्गाची खूण सांगितली आहे. जेव्हा सुटलेले वारे अचानक बंद होतात आणि संध्याकाळी दिवस मावळताना आकाश पूर्णपणे ‘तांबडे’ (लालसर) होते, तेव्हा तो हमखास पावसाचा संकेत असतो. ज्या भागात असे तांबडे आभाळ दिसेल, तिथे पुढील ७२ तासांत निश्चित पाऊस येतो. हा निसर्गाचा संदेश शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. एकंदरीतच, पावसाने दिलेली ओढ आता संपणार असून, बळीराजाने आता कोणतीही चिंता न करता आपल्या पेरणीच्या तयारीला लागावे, असे आवाहन पंजाब डख यांनी केले आहे.

Santosh Kale Patil is the Founder and Chief Editor of Sheti 24 Taas. As a dedicated digital content creator and agricultural journalist from Maharashtra, he specializes in providing authentic daily market rates (Bajar Bhav), crop insurance updates, and vital farming news. His primary mission is to empower the ‘Biliraja’ (farmers) by delivering timely, accurate, and fact-checked information.