राज्यात लवकरच मान्सूनच्या पावसाला सुरुवात होणार असून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशासह सर्वच भागात सोयाबीन पेरणीची लगबग सुरू झाली आहे. सध्या बाजारात खतांच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी वर्गाने सोयाबीन पेरणी करताना खतांचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. चुकीच्या खतांच्या वापरामुळे केवळ खर्च वाढतो असे नाही, तर उत्पादनावरही परिणाम होतो. त्यामुळे सोयाबीनसाठी नेमके कोणते खत वापरावे आणि कोणती खते देणे टाळावे, याविषयी कृषी तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
ही खते वापरणे आवर्जून टाळा
सोयाबीन, हरभरा, मूग किंवा उडीद ही द्विदल आणि तेलवर्गीय पिके आहेत. या पिकांच्या मुळांवर नैसर्गिकरित्या गाठी असतात. या गाठी हवेतील नायट्रोजन (नत्र) शोषून घेतात आणि पिकाच्या वाढीची गरज आपोआप पूर्ण करतात. एवढेच नव्हे तर जमिनीत अतिरिक्त नायट्रोजन साठवण्याचे कामही ही पिके करतात.
या कारणास्तव, सोयाबीनला बाहेरून नायट्रोजन (नत्र) युक्त खते देण्याची अजिबात गरज नसते. अनेक शेतकरी अज्ञानापोटी युरिया, डीएपी (DAP) किंवा २०:२०:०:१३ यांसारख्या खतांचा वापर करतात. मात्र, सोयाबीनला या खतांची आवश्यकता नसल्याने यामुळे शेतकऱ्यांचा खतांवरील नाहक खर्च वाढतो. त्यामुळे पेरणी करताना ही खते शक्यतो टाळावीत.
सोयाबीन पेरताना नेमकी कोणती खते वापरावीत?
खर्च कमी करून उत्पादनात भरघोस वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील तीन खतांपैकी कोणत्याही एकाच खताचा वापर करावा. (प्रमाण: प्रति एकरी दीड गोणी म्हणजेच ७५ किलो)
१. १०:२६:२६ (10:26:26) – एकरी ७५ किलो
२. १४:३५:१४ (14:35:14) – एकरी ७५ किलो
३. १२:३२:१६ (12:32:16) – एकरी ७५ किलो
वर दिलेल्या तीन पर्यायांपैकी जे खत बाजारात सहज उपलब्ध असेल, त्याचा वापर शेतकरी बांधवांनी करावा.
येथे वाचा – नवीन पीक कर्ज कधी आणि किती मिळणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
‘सल्फर’चा (गंधक) वापर आहे अत्यंत महत्त्वाचा
सोयाबीन हे एक तेलवर्गीय पीक असल्याने त्याला मुख्य अन्नद्रव्यांसोबतच सल्फर (गंधक) या अन्नद्रव्याची सर्वाधिक गरज भासते. यासाठी शेतकरी बांधवांनी महाधन कंपनीचे ‘बेस बेंटोनाईट सल्फर’ (ज्याला बेन्सल्फ म्हटले जाते) याचा वापर करावा.
पेरणी करताना निवडलेल्या मुख्य खतामध्ये (उदा. १०:२६:२६) प्रति एकरी १० किलो ‘बेन्सल्फ’ व्यवस्थित मिसळून द्यावे. यामुळे पिकाला आवश्यक असलेले सल्फर मिळते, दाण्याची प्रत सुधारते आणि तेलाचे प्रमाण वाढून उत्पादनात मोठी वाढ होते.
यंदाच्या हंगामात सोयाबीन पेरणी करताना शेतकऱ्यांनी हे स्मार्ट खत व्यवस्थापन केल्यास त्यांच्या पैशांची मोठी बचत होईल आणि दर्जेदार उत्पन्न हाती येईल, असा विश्वास कृषी जाणकारांनी व्यक्त केला आहे.