सोयाबीनला बीजप्रक्रिया कोणती करावी?

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र शेतकरी सोयाबीन पेरणीच्या तयारीत गुंतले आहेत. मशागत आणि खतांच्या नियोजनासोबतच चांगले उत्पादन मिळवण्यासाठी पेरणीपूर्वी ‘बीजप्रक्रिया’ करणे अत्यंत गरजेचे आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, बीजप्रक्रिया हे बियाण्यांसाठी एका ‘लसीकरणा’सारखेच काम करते, ज्यामुळे भविष्यात पिकावर येणारे गंभीर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वेळेच रोखता येतो.

खोड अळी आणि बुरशीचा मोठा धोका

सोयाबीनच्या पिकावर सुरुवातीच्या काळात ‘खोड पोखरणारी अळी’ हल्ला करते. ही अळी थेट खोडात शिरून आतून पोखरते, जी सहसा बाहेरून डोळ्यांना दिसत नाही. नेमक्या शेंगा लागण्याच्या आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत या अळीच्या प्रादुर्भावामुळे पिकाला पोषण मिळत नाही. परिणामी, शेंगा पोचट (पोकळ) राहतात आणि उत्पादनात मोठी घट होते. याशिवाय, जमिनीतील हानिकारक बुरशीमुळे मुळकूज, खोडसड आणि कॉलर रॉट यांसारखे रोग पिकाला उद्ध्वस्त करू शकतात. या संकटांवर मात करण्यासाठी बीजप्रक्रिया हाच सर्वात प्रभावी उपाय आहे.

अशी करा योग्य बीजप्रक्रिया

या धोक्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी खालीलप्रमाणे औषधांचे प्रमाण वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे:
कीटकनाशक: खोड अळीच्या नियंत्रणासाठी एका किलो बियाण्याला ४ मिली ‘रिहांश’ लावावे.
बुरशीनाशक: मुळकूज आणि खोडसड रोखण्यासाठी एका किलो बियाण्यामागे ३ मिली ‘जोरमेट’ वापरावे.
पाण्याचे प्रमाण: या औषधांसोबत एका किलोसाठी ५ मिली पाणी मिसळावे.
एका किलो सोयाबीन बियाण्यासाठी ४ मिली रिहांश, ३ मिली जोरमेट आणि ५ मिली पाणी एकत्र करून द्रावण तयार करावे आणि ते बियाण्याला सर्व बाजूंनी व्यवस्थित चोळून लावावे.

येथे वाचा – नवीन पीक कर्ज कधी आणि किती मिळणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती!

पेरणीच्या आधीच करा नियोजन

अनेकदा शेतकरी घाईघाईत पेरणीच्या दिवशीच बीजप्रक्रिया करतात. परंतु, पेरणीच्या ८ ते १५ दिवस आधी जरी ही प्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवून ठेवले, तरी त्याचे अधिक उत्तम परिणाम मिळतात. यामुळे औषध बियाण्यात चांगल्या प्रकारे मुरते.

भविष्यातील मोठे नुकसान टाळण्यासाठी आणि भरघोस उत्पादन हाती घेण्यासाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने सोयाबीन पेरणीपूर्वी आपल्या बियाण्याचे हे ‘लसीकरण’ अवश्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Comment