Crop Loan 2026 : नमस्कार शेतकरी मित्रांनो! बऱ्याच प्रतीक्षेनंतर मान्सून पुन्हा एकदा महाराष्ट्रात सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. पावसाळ्याची चाहूल लागली की आपल्या बळीराजाची लगबग सुरू होते. यंदाच्या हंगामात पाऊस कसा राहील याच्या चर्चा तर सुरू आहेतच, पण सध्या प्रत्येक शेतकऱ्याला सर्वाधिक वेध लागले आहेत ते ‘नवीन पीक कर्जाचे’! पेरणीचे दिवस जवळ आले की बी-बियाणे, खते यासाठी पैशांची जुळवाजुळव करावी लागते. म्हणूनच, यंदा पीक कर्जाचं वाटप कधी सुरू होईल? आणि कोणत्या पिकासाठी हेक्टरी किती रक्कम मिळणार? असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतील ना? चला तर मग, तुमच्या याच प्रश्नांची अचूक उत्तरे आज आपण एकदम सोप्या भाषेत जाणून घेऊया.
नवीन पीक कर्ज मिळण्यास विलंब का होत आहे?
सहसा दरवर्षी १५ एप्रिलच्या आसपास बँका नवीन पीक कर्ज देण्यास सुरुवात करतात. मात्र, यंदा परिस्थिती थोडी वेगळी आहे. तुम्हाला माहीतच असेल की, सध्या राज्य सरकारची कर्जमाफीची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बनवणे, त्यांचा डेटा गोळा करणे आणि आधार प्रमाणीकरण करणे ही कामे सध्या जोरात सुरू आहेत.
जोवर ही जुन्या कर्जाची आणि कर्जमाफीची क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण होत नाही, किंवा पहिल्या टप्प्यातील याद्या लागत नाहीत, तोवर बँका नवीन कर्जाच्या फाईल्स पुढे सरकवायला फारशा उत्सुक नाहीत. बँकांचे लक्ष सध्या जुन्या प्रक्रियेवर असल्यामुळे, नवीन पीक कर्ज हातात पडण्यासाठी शेतकऱ्यांना साधारण १५ जुलैपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
तुमच्या पिकाचे कर्जाचे दर कोण आणि कसे ठरवते?
कोणत्या पिकासाठी किती कर्ज द्यायचे, हा निर्णय राज्यस्तरीय बँकर्स समिती (SLBC) आणि जिल्हास्तरीय तांत्रिक समित्या मिळून घेतात. प्रत्येक पिकाचा उत्पादन खर्च आणि लागणारा पैसा याचा अभ्यास करून कर्जाची एक किमान (कमीत कमी) आणि कमाल (जास्तीत जास्त) मर्यादा ठरवली जाते. प्रत्येक जिल्ह्यानुसार या दरांमध्ये थोडाफार बदल असू शकतो. २०२६ च्या चालू आर्थिक वर्षासाठी याच नव्या दरांनुसार कर्जवाटप होणार आहे.
येथे वाचा – कर्जमाफीची मोठी बातमी! जाचक अटींबाबत शासनाने उचलले ‘हे’ मोठं पाऊल
कोणत्या पिकाला आणि शेतीपूरक व्यवसायाला किती कर्ज मिळणार?
चला तर मग, यंदाच्या हंगामासाठी ठरवण्यात आलेले कर्जाचे संभाव्य दर पाहूया:
धान (भातशेती): सुधारित धानासाठी साधारणतः ६८,००० ते ८२,५०० रुपयांपर्यंत, तर उन्हाळी बासमती धानासाठी ६८,५०० ते ८२,५०० रुपयांपर्यंत कर्ज मर्यादा आहे. खरीप धानासाठी ६१,००० ते ८१,२५० रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
ज्वारी: तुम्ही बागायती ज्वारी करत असाल तर ३६,००० ते ५६,००० रुपयांपर्यंत आणि जिरायतीसाठी ३३,००० ते ५१,००० रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन: एका गाईसाठी १५,००० ते ३५,२०० रुपये आणि म्हशीसाठी १५,००० ते ४१,८०० रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे. शेळीपालन करणाऱ्यांसाठी (१० शेळ्या आणि १ बोकड) १४,००० ते ३८,५०० रुपयांपर्यंत मदत मिळते.
कुक्कुटपालन (Poultry): १०० पक्षांमागे (बॉयलर) ६,३०० ते ३५,२०० रुपयांपर्यंत, लेयर पक्ष्यांसाठी ६,३०० ते ५१,७०० रुपये आणि गावठी कोंबड्यांसाठी ७,४०० ते ५१,५०० रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.
मत्स्यपालन (Fisheries): मच्छीमारांसाठी त्यांच्या बोटीच्या प्रकारानुसार (यांत्रिक किंवा बिगर यांत्रिक) ८० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. गोड्या पाण्यातील किंवा शोभिवंत मत्स्यपालनासाठी दीड लाखांपासून ते थेट ५ लाखांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. तसेच पिंजरा पद्धतीच्या मत्स्यपालनासाठी प्रति पिंजरा ५० ते ६० हजार रुपये कर्ज उपलब्ध आहे.